अकोला- गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात आज स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. विशेष म्हणजे, मुलीचा शोध लावण्यात अपयशी ठरलेल्या सिव्हील लाईन पोलिसांच्याविरोधात मुलीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर शासनालाही या प्रकरणात उत्तर द्यावे लागले होते.
सिव्हील लाईन पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गेल्या ६ महिन्यांपासून शोध लागत नव्हता. याप्रकरणी तिच्या वडिलांनी सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून मुलीचा तपास न लागल्याने तिच्या वडिलांनी नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. याचिकेमुळे पोलीस विभागावर अकार्यक्षमतेचा ठपका लागला होता. त्यासोबतच जिल्ह्यातून एकूण किती मुली बेपत्ता झाल्या होत्या याबाबतही पोलीस अधीक्षक यांना विचारणा करण्यात आली होती. तसेच त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. दरम्यान, राज्य शासनालाही यामध्ये नागपूर खंडपीठाने धारेवर धरले होते.