अकोला - पातूर तालुक्यातील चतारी गावातील 25 जणांचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, 11 रुग्ण हे उपचार घेत आहे. आरोग्य विभाग ठोस उपाययोजना करीत नसल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, आता रुग्णांची संख्या वाढल्याने, आरोग्य यंत्रणेने घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी सुरू केली आहे.
पातूर तालुक्यातील चतारी येथे 2010 मध्ये मूत्रपिंडाच्या आजाराचा बळी गेला. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 25 जणांचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चतारी गावात ज्या शासकीय विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो, त्या विहिरीचे पाणी दूषित असून त्यामध्ये मॅग्नेशियम व क्षारांचे प्रमाण जास्त आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे नागपूर व अकोला शासकीय प्रयोगशाळेचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने सन २०१० मध्ये ठराव पारित करून जलशुद्धीकरण यंत्र बसवण्या संबंधी प्रशासनाकडे अहवाल पाठवला होता.
दरम्यान, या दूषित पाण्यामुळे गावामध्ये मूत्रपिंडाचे आजार होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, आज रोजी अनेक ग्रामस्थ मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रासले आहेत. या विषयावर माजी मुख्यमंत्री, राज्यपाल, माजी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार व जिल्हा प्रशासन यांच्याकडे दहा वर्षांपूर्वीपासून निवेदनाद्वारे त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. यानंतर गेल्या वर्षी जलशुद्धीकरण यंत्र बसवले. परंतु, ते बंद असल्याने केवळ शोभेची वस्तू बनले आहे. आजही ग्रामस्थांना दूषितच पाणी प्यावे लागत आहे. यातही मजूर वर्गातील लोक मोठ्या प्रमाणात आजारी आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार आणि महागडी औषधे परवडण्यासारखी नाहीत. त्यामुळे त्यांचा जगण्यासाठीची धडपड अधिक गंभीर स्थितीत पोहोचली आहे.