अकोला -जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न यावर्षी सुटलेला आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे. मात्र, काटेपूर्णा प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी दुसरा रस्ता पकडला आहे. पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा प्रकार घडत असून शेतकरी सिंचनाच्या पाण्यासाठी धावाधाव करीत आहे. रब्बी हंगाम लागला, तरी कालव्यांची दुरुस्ती पाटबंधारे विभागाने केली नाही. तर सध्या या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून त्यासंदर्भात पुढील कारवाई करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केल्यामुळे साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रकार हा विभाग करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
कालव्यामध्ये उगवली गांजरगवत आणि झाडे -
काटेपूर्णा प्रकल्पावर साडेतीन हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येत आहे. या वर्षी हा प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे. कालव्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविले जात आहे. परंतु, बरेच कालवे हे खराब झाले असून अनेक कालव्यामध्ये गांजर गवत, झाडे उगवली आहेत. तर काही कालवे हे खचलेले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे काही दहिगाव गावंडे या गावाला लागून असलेल्या जवळपास दहा ते पंधरा गावांमध्ये दोनशे ते अडीचशे एकर जमीन पाण्याखाली जमीन गेलेली असताना ती ओलीत होत नाही. परंतु पाटबंधारे विभागाच्या बेफिक्रीमुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हे चिंतित झाले असून त्यांना रब्बी हंगामातही पीक घेता येणे शक्य झाले झाले नाही.