अकोला : केंद्र सरकारने युवकांना रोजगार देऊन देशातील बेरोजगारी संपविणार, असे म्हटले होते. परंतु, देशातील युवकांना रोजगार न मिळाल्याने बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने युवकांना नोकरीचे दिलेले वचन पूर्ण करावे, यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज(बुधवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सन 2014 पासून केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे. या सरकारने युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले होते. परंतु, रोजगार तर दूरच उलट मात्र, बेरोजगारी आणखीन झपाट्याने वाढली आहे. शासनाच्या विवीध विभागांमध्ये लाखो पदेही रिक्त आहेत. ही पदे भरण्यास केंद्र सरकारकडून अजून कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. तसेच युपीएससी उत्तीर्ण अधिकाऱ्यांना उच्चपदस्थ न देता खासगी कंपन्यांमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या विविध विभागात बड्या पदावर विराजमान केल्या जात आहे. तसेच बेरोजगारीच्या प्रमाण वाढीसाठी केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे. होतकरू युवकांचे त्यांना कर्ज मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. परिणामी देशात कुशल व्यापारी किंवा कामगार तयार होत नसल्याचे चित्र आहे.