अकोला- देशातील सरकार अजूनपर्यंत तरुणांना रोजगार देऊ शकलेले नाही. आजचा तरुण हा भारत-पाकिस्तान, हिंदू-मुसलमानच्या चक्रव्युहात फसला आहे. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी एनएसयुआयतर्फे 'बेरोजगार यात्रा' काढण्यात आल्याचे काँग्रेस युवानेता हार्दिक पटेलने सांगितले. राज्यभरात या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे.
एनएसयुआयतर्फे काढण्यात आलेल्या बेरोजगार यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना हार्दिक पटेल शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. सन २००० या साली विद्यार्थी शिक्षण संपवून बाहेर पडल्यानंतर त्याच्यासाठी रोजगार उपलब्ध होता. परंतु, आता शिक्षण संपवून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे रोजगार उपलब्ध नाही. अनेक बेरोजगार युवक वडिलांसोबत शेतात काम करीत असल्याची परिस्थिती आहे. एनएसयुआयतर्फे काढण्यात आलेल्या बेरोजगार यात्रेत हजारो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या सहभागावरून किती बेरोजगारी आहे, हे सिद्ध होत असल्याचा आरोपही हार्दिकने केला.
त्याचबरोबर, जीएसटीमुळे उद्योगांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढल्याचा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख यांनी केला आहे. ही बेरोजगार यात्रा स्वराज्य भवन येथून सुरू होऊन ती मदनलाल धिंग्रा चौक मार्गे गांधी रोड, पंचायत समिती कार्यालयासमोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. यानंतर हार्दिक पटेल, आमिर शेख, आकाश कवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यात्रेदरम्यान युवतीला आली भूरळ
एनएसयूआयतर्फे काढण्यात आलेल्या बेरोजगार यात्रेत शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. ही यात्रा स्वराज्य भवन येथून निघून ती जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. यावेळी कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या मंचासमोर विद्यार्थी उभे होते. आमीर शेख यांचे भाषण सुरू असताना एका विद्यार्थिनीला भूरळ आली. ती पडत असताना जवळच असलेल्या मुलींनी तिला सावरले. तिला बाजूला घेऊन गेले. त्यानंतर त्या मुलीला रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.