अकोला -अकोट फैलमधील मच्छी मार्केटमध्ये ५०० रुपयाच्या बनावट नोटा चालवणाऱ्या जावई व साळ्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज स्थानिक गुन्हे शाखेने केली. पोलिसांनी आरोपींकडून ५०० रुपयाच्या ७९ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. अबरार खान हयात खान व शेख राजीक शेख चांद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी ५०० रुपयाच्या बनावट नोटा मच्छी मार्केटमध्ये चालवत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होत. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अबरार खान यास ताब्यात घेतले व त्याच्याकडून ५०० रुपयाच्या एकच क्रमांकाच्या तीन नोटा जप्त केल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तेथे एकच क्रमांकाच्या ५४ बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जानोरी येथून अबरारचा साळा शेख राजीक शेख चांद याला देखील अटक केली.