अकोला - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कलकत्ता धाबा येथे उभा असलेला रिकामा ऑक्सिजनचा टँकर प्रादेशिक परिवहन विभागाने ताब्यात घेऊन तो खदान पोलीस ठाण्यात आज दुपारी जमा केला. हा टँकर नेमका कशासाठी जमा करण्यात आला यासंदर्भात आरटीओचे मोटर वाहन निरीक्षक तथा खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे कुठलीही माहिती नाही, हे विशेष. टँकर चालकासोबत दिवसभर घडलेल्या या घटनेबाबत कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नसल्याने हे प्रकरण नेमके काय आहे, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
हेही वाचा -विजेच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता, ऊर्जा राज्यमंत्र्यांचे संकेत
व्याळा गावाजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कलकत्ता धाबा येथे ऑक्सिजनचा रिकामा टॅंकर क्र. एमएस 04 एचडी 3726 हा चालक शरद कांबळे (रा. लातूर) यांनी शनिवारी सायंकाळपासून उभा ठेवला होता. त्यांनी अमरावती येथील शासकीय रुग्णालय, मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन प्लांटमध्ये टँकरमधील ऑक्सिजन भरले होते. शनिवारी सायंकाळी त्यांचे काम संपल्यामुळे ते परत पुणे त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. कलकत्ता धाबा येथे ते जेवणासाठी थांबले व रात्रभर त्यांनी तिथेच मुक्काम केला. आज दुपारी ते परत जेवण करून पुणे येथे जाणार होते. परंतु, हा टॅंकर कलकत्ता धाबा येथे उभा असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना मिळाली. त्यांनी ही माहिती जिल्हाधिकारी आणि मोटर वाहन निरीक्षक प्रफुल्ल मेश्राम यांना सांगितली. मोटर वाहन निरीक्षक मेश्राम यांनी चालक पप्पू शेख यांना सोबत घेऊन हा टँकर कलकत्ता धाबा येथून ताब्यात घेतला आणि तो खदान पोलीस स्टेशनमध्ये जमा केला. चालकालाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.