अकोला - जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे अवैध सावकारी आणि चिठ्ठीच्या माध्यामातून अवैधरित्या पैसे व मुल्यांचा व्यवहाराप्रकरणी छापे टाकण्यात आले होते. या कारवाईत संतोष राठी आणि राजेश राठी या दोघांकडे ३५ लाख रोख आणि ४५० धनादेशसोबतच खरेदीची कागदपत्रेही सापडली आहेत. या खरेदीची कागदपत्रे नेमकी कोणाच्या नावे आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे दोनही राठी अवैध सावकारी तसेच चिट्ठीच्या माध्यामातून अवैधरित्या पैशांचा व्यवहार करत असल्याचे समोर आले आहे. तरीही छापा टाकणाऱ्या तिन्ही पथकाच्या अहवालावरून पुढील कारवाई होणार आहे.
शहरातील दोन व्यापारी तसेच चिठ्ठीच्या माध्यमातून अवैधरित्या व्यवहार करणारे दलाल यांच्या अवैध सावकारीच्या तक्रारी सहकार विभागाकडे आल्या होत्या. यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या ३ पथकांनी संतोष शंकरलाल राठी आणि राजेश घनशामदास राठी यांच्या निवासस्थानी छापेमारी करुन तब्बल ३४ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या दोन्ही ठिकाणावरुन ४५० पेक्षा अधिक धनादेश जप्त करण्यात आले आहेत. या छापेमारीत संतोष राठी याच्या राजस्थान भवन येथील कार्यालयातून आणि राजराजेश्वर हाउसींग सोसायटीवरुन २४ लाख ९४ हजार ६९७ रुपये रोख तसेच ८९ धनादेश जप्त करण्यात आले. तर, राजेश राठी याच्या रामनगर येथील घरातून ८ लाख ३४ हजार ५०५ रुपये रोख, ३४१ धनादेश आणि काही खरेदखतही जप्त करण्यात आले आहेत.