अकोला -गेली ३२ वर्षे अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अखंडपणे सुरू आहे. भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन आणि महाराष्ट्राला राजकीय सामाजिक दिशा देणारी जाहीर सभा, असा दरवर्षीचा शिरस्ता. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ९ ऑक्टोबर २०१९ रोजी ह्या वर्षीचा धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अकोला रेल्वे स्थानक ते क्रिकेट क्लब मैदानापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त परिश्रमाने अॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या ह्या 'विशाल मिरवणूक व जाहीर सभां'चा सिंहाचा वाटा राहिला आहे. नागपूरच्या धर्तीवर अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम घेण्यासाठी चर्चा झाली. नागपूरला कार्यक्रम होऊन अनेक अनुयायी बुलढाणा वाशिम व मराठवाडा भागात परत जाताना अकोला रेल्वे स्थानकावर मुक्कामी असत. त्या काळी फार दळणवळणाची साधने नसल्याने रेल्वे स्थानक आणि स्थानकावर मुक्कामी राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे अनुयायांकरीता सोयीचे होईल यादृष्टीने अकोल्यात हा सोहळा आयोजित करण्याबाबत विचार करण्यात आला आणि लागलीच त्याची अंमलबजावणीही झाली.