अकोला- जिल्ह्याला गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणाने आच्छादून टाकले आहे. अधूनमधून पावसाची रीप-रीप, ग्रामीण भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाने शेतकऱ्यांना त्रस्त केले असून त्यांचे हातचे पीक जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीचा दुसरा दिवस असताना पावसाचे जोर कायम असून आज सकाळपासूनच पावसाने रिमझिम आणि नंतर जोरदार हजेरी लावली. दिवाळीच्या फटाक्यांची आतिषबाजीमध्ये पावसाचीच अतिषबाजी जोरदार असल्याने ही दिवाळी पावसाळी दिवाळी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
परतीचा पाऊस लांबला असल्यामुळे सर्वत्र राज्यभरात हवामान खात्याने अतिवृष्टीचा तसेच दक्षतेचा इशारा दिला होता गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणाने थंडावा निर्माण झाला होता. या ढगाळ वातावरणाने शेतातील पिकांचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. त्यामधून होणारा रिमझिम आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाने तर शेतात पाणी साचले आहे. परिणामी शेतकऱ्यांचा हायब्रीड कापूस सोयाबीन काढणीला आलेले हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. हाती आलेले पीक डोळ्यादेखत जात असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक चणचण ऐन दिवाळीत निर्माण झाली आहे. त्यामुळे या दिवाळीतही शेतकरी आनंदी नसल्याची स्थिती झाली आहे.