अकोला -महाराष्ट्रामध्ये उन्हाचा पारा वाढत आहे. विदर्भात तर राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात मंगळवारी 39.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 39.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला जिल्ह्यात झाली आहे.
मार्चपासूनच अकोल्याचा पारा वाढत आहे. हवामान विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार यावर्षीचा उन्हाळा हा तीव्र राहणार आहे. इतर विभागांच्या तुलनेत विदर्भात यंदा सर्वाधिक तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उष्णतेची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. 25 फेब्रुवारीपासून अकोल्यामध्ये 38 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानाची नोंद होत आहे. एकीकडे अकोल्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे तापमान देखील वाढत असल्यामुळे अकोलेकरांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे.