महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hailstorm Damage Agriculture In Akola: गारपिटीने अकोला जिल्ह्यातील बाराशे हेक्टर शेतीवर परिणाम; बळीराजा चिंताग्रस्त - Hailstorm Damage Agriculture In Akola

आधीच अस्मानी संकटांनी वेढलेल्या शेतकऱ्यांना पीक निघण्याच्या शेवटच्या घटकाला अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. पीक विम्याची प्रतीक्षा, नुकसानीची भरपाई अजूनही न मिळालेल्या शेतकऱ्यांना अवकाळी आणि गारपिटीने ग्रासले असल्याने त्यांचे हातचे पीक नष्ट झाले आहे.

Hailstorm Damage Agriculture In Akola
गारपीटीने शेतीचे नुकसान

By

Published : Mar 19, 2023, 7:05 PM IST

नुकसानग्रस्त शेतकरी त्यांची व्यथा मांडताना

अकोला:जिल्ह्यातही सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांच्या 'हिरव्या स्वप्नां'चा पार चिखल करून टाकला आहे. गहू, संत्रा, लिंबू, आंब्याचा बहर गारपिटीने पडला आहे. पातूर तालुक्यातील हरिदास करवते यांनी आपल्या साडेतीन एकरात संत्र्याची लागवड केली आहे. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने त्यांचे नुकसान केले आहे. त्यांची संत्र्याची बाग उध्वस्त झाली आहे. उत्पन्नाचे स्रोत असे डोळ्यादेखत निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची आस आता शासनाच्या मदतीकडे लागली आहे.

गव्हाच्या पीकाचे मोठे नुकसान

'या' तालुक्यांना जबर फटका: पातूर, बार्शीटाकळली, पातूर तालुक्यातील गावांना चांगलाच फटका बसला आहे. पातूर तालुक्यातील सर्वांत जास्त प्रभावित असलेल्या कोठारी गावातील परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. येथे गहू पूर्णपणे झोपला आहे. यामुळे जवळपास बाराशे हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून 765 शेतकरी चिंतेने बाधीत झाले आहे.

हाती आलेले पीक एका रात्रीत भूईसपाट झाले

विविध तालुक्यातील शेतीचे नुकसान: करवते सारखीच अवस्था या भागातील इतर शेतकऱ्यांची आहे. जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय तो पातूर, बार्शिटाकळी आणि अकोट तालुक्याला. तर पातूर परिसरातिल आस्टूल-पास्टूल, कोठारी, खानापूर, शिर्ला, देऊळगावलाही या प्रकोपाचा मोठा फटका बसलेला आहे. या भागातील गहू, कांदा, आंबा, संत्रा यासोबतच इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आता मदतीसाठी सरकारकडे आस लावून बसले आहेत. याच गावातील शमीम पठाण या कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा अस्वस्थ करणारी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अवकाळीने चांगलेच झोडपले आहे. परिणामी, शेतकरी आता शासन कधी पंचनामा करते आणि कधी नुकसान भरपाई मिळते याकडे आस लावून बसला आहे.

नुकसान झालेल्या बागेची पाहणी करताना शेतकरी

तेल्हारा सर्वाधिक प्रभावित:अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 9.9 मिमी पाऊस पडला आहे. यामध्ये एक हजार 200 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, भुईमूग, टरबूज, संत्रा, लिंबू यासह आंब्याचेही नुकसान झाले आहे. यामध्ये 765 शेतकरी बाधित झाले आहे. तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीवरून तेल्हारा तालुका हा जास्त प्रभावित झाला आहे.


संपामुळे पंचनामे रखडले:जिल्ह्यात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे दरम्यानच्या काळात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी संपावर असल्याने ते रखडले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासन काय भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा:Sanjay Raut On Kiren Rijiju: रिजिजू यांची टिप्पणी, 'हा' तर न्यायाधीशांना धमकावण्याचा प्रयत्नः संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details