अकोला - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर प्रतिबंध करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहेत. रुग्णांची साखळी तोडण्यात अपयश आल्यामुळे पालकमंत्री यांनी प्रशासन व सर्वपक्षीय बैठक घेऊन 1 ते 6 जून या दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. परंतु, अकोलेकरांनी सुरुवातीपासूनच जनता कर्फ्यूला कुठल्याच प्रकारचा पाठिंबा न दिल्याने शेवटी पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज (मंगळवारी) एक पत्रक काढून जनता कर्फ्यू रद्द केल्याचे नमूद केले आहे.
अकोल्यात जनतेनेच नाकारला ‘जनता कर्फ्यू’, पालकमंत्र्यांनी काढले महत्त्वाचे पत्रक - अकोला कोरोना बातमी
अकोलेकरांच्या असहकारामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करत पालकमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या अपयशाचे खापर अकोलेकरांवर फोडले आहे.
कडू यांनी 28 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात प्रशासन व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी एकमताने 1 जून ते 6 जून पर्यंत जनता कर्फ्यू करण्यात येत असल्याचे आदेश दिले होते. परंतु, या आदेशाला मुख्य सचिवांची परवानगी दिली नाही. त्यामुळे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोलेकरांना स्वतः हून जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. शेवटच्या क्षणापर्यंत जनता कर्फ्यूच्या संदर्भातील अधिकृत घोषणा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली नव्हती. त्यामुळे अकोलेकरांना सुरुवातीपासूनच या जनता कर्फ्युबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
त्यामुळे 1 जून रोजी जनता कर्फ्यूला अकोलेकरांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. परंतु, दुसर्या दिवशी या जनता कर्फ्यूला अकोलेकरांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जनता कर्फ्यूला अकोलेकरांबद्दल असहकाराची भाषा व्यक्त केली. त्यांनी जिल्हा प्रशासनाद्वारे पत्रक काढून जनता कर्फ्यू 1 जून ते 3 जूनपर्यंत चालू राहणार आहे. तर 4 जून ते 6 जूनला कर्फ्यू रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.