अकोला-आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या समोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. परिचालक आर्थिक संकटात सापडले असल्याने त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण
मागील आठ ते दहा महिन्यांपासून जिल्ह्यातील संगणक परिचालकांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
थकित मानधन देण्यात यावे, एप्रिल पासून आजपर्यंत चालू मानधन त्वरित देण्यात यावे, संगणक, प्रिंटरचे स्पेअर पार्ट देण्यात यावे, राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर संगणक परिचालकांना नियुक्ती द्यावी, यांसह इतर मागण्यांसाठी परिचालकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
यावेळी पवन फाळके, पंकज ताले, आकाश उगले, गजानन कराळे, पंडित वासनिक, अभिलाश मोरे, विठ्ठल रगळे यांच्यासह आदींनी या उपोषणात सहभाग घेतला.