अकोला -जानेवारीमध्ये मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत मनुताई कन्या शाळेतील विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. 'मनुताई किट्स एंजल' नावाने त्या विदर्भाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. शाळेतील मुलींना मागील दोन महिन्यांपासून रोबोटिक्सचे प्रशिक्षण दिले जात आहे. सर्वसामान्य मुलींना पुस्तकी ज्ञानासोबतच रोबोटिक्स, विज्ञान-तंत्रज्ञान, इंग्लिश कम्युनिकेशन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प तयार करण्याचे ज्ञान मिळावे हा मागचा उद्देश आहे.
मनुताई कन्या शाळा ही विदर्भातील सर्वात जुनी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली शाळा आहे. किट्स (काजल इनोव्हेशन टेक्निकल सोल्युशन) संस्थेच्या सामाजिक विभागाच्यावतीने राष्ट्रीय रोबोटिक्स तंत्रज्ञान स्पर्धेच्या 'फर्स्ट लिग्यु लीगच्या' निमित्ताने शाळेतील मुलींची तयारी सुरू आहे. मुली रोज रोबोटिक्सवर आधारित यंत्रणांशी एकरूप होऊन नवनवीन प्रयोग करत आहेत. या स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करणारी ही मुलींची पहिली बॅच असणार आहे.