ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निनावी अर्जामुळे २ महिन्यानंतर अल्पवयीन मुलीचा मृतदेह कबरीबाहेर काढून केले शवविच्छेदन - tomb

त्या निनावी अर्जात मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून मुलीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लिहले होते.

घटनास्थळ
author img

By

Published : May 5, 2019, 6:56 PM IST

Updated : May 5, 2019, 7:28 PM IST

अकोला- पोलीस ठाण्यात एका निनावी अर्जात अल्पवयीन मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याने तब्बल २ महिन्यानंतर तिचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन केले. त्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या तक्रारीनंतर बाळापूर पोलिसांनी ही कारवाई केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच त्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

बाळापूर शहरातील जवळी वेस भागात राहणाऱ्या एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा ९ मार्च रोजी मृत्यू झाला होता. तिचे आई-वडील व नातेवाईकांनी तिच्यावर अंत्यसंस्कारही केले होते. त्यानंतर २० मार्चला पोलीस ठाण्यात एक निनावी अर्ज प्राप्त झाला. त्यामध्ये मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून मुलीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लिहले होते. तिच्या नातेवाईकांनी बदनामी होऊ नये म्हणून नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासवून कोणतीही तक्रार न देता अंत्यसंस्कार उरकून घेतल्याचे त्यात सांगण्यात आले होते. त्यानंतर २४ मार्चला बाळापूर शहरातीलच इलियास अहमद अब्दुल सादिक कुरेशी यांनी याच आशयाची लेखी तक्रार देऊन चौकशीची मागणी केली होती.

निनावी अर्जामुळे २ महिन्यानंतर अल्पवयीन मुलीचा मृतदेह कबरीबाहेर काढून केले शवविच्छेदन

पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन तत्काळ चौकशी सुरू केली. यामध्ये मृत मुलीचे वडील, नातेवाईक, प्रत्यक्षदर्शी आणि अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या लोकांच्या साक्ष नोंदवण्यात आले. यात, सर्वांनी मुलीचा मृत्यू नैसर्गिक असून तिच्या मृत्यूबाबत संशय नसल्याचे सांगितले. त्यानंतर उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका देखील दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा पारदर्शक तपास व्हावा म्हणून पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी तपास करून स्वतः सरकारतर्फे फिर्यादी दिली.

या प्रकरणी १ एप्रिलला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी बाळापूर ह्यांची लेखी परवानगी घेऊन ५ एप्रिलला २ महिन्यानंतर त्या मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला. जागेवरच सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सचिन गाडगे, डॉ. कुलकर्णी व त्यांच्या चमूने निवासी नायब तहसीलदार कोठेकर व सरकारी पंचासमक्ष मृतदेहाचे शवविच्छेदन कले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बाळापूर शहराच्या इतिहासामध्ये कबरीमधून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने शहरात अफवांचे पीक भरपूर होते. परंतु, पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कुशलतेने परिस्थिती हाताळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मृत्यूचे निश्चित कारण समजल्यावर पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सुरेंद्र जोशी, हर्षल श्रीवास, राठोड हे करीत आहेत.

Last Updated : May 5, 2019, 7:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details