अकोला - जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ जुलै रोजी सायंकाळी एका 14 वर्षाच्या मुलीला तीन जणांनी पेशवाईचे काम आहे, असे सांगत अकोला रेल्वे स्थानकावर नेले. तिथे त्यांना विक्रमसिंग रतनलाल सिसोदीया व जायदाबी मोहम्मद हाशम भेटले. त्या सर्वांनी अल्पवयीन मुलीला राजस्थानमध्ये नेऊन तेथील रतन नावाच्या व्यक्तीसोबत तिचे लग्न लावून दिले. यासाठी या सर्वांनी रतनकडून दोन लाख रुपये घेतले.
अल्पवयीन मुलीला विकणाऱ्या टोळीला केले जेरबंद, जुने शहर पोलीसांची कारवाई त्यानंतर, रतनने पत्नी म्हणून त्या अल्पवयीन मुलीशी जबरीने अत्याचार करत, तिने विरोध केला असता मारहाण करून चटकेही दिले. विशेष म्हणजे, तिला दोन लाख रुपयांना विकत घेतल्याचे रतनने स्वतः तिला सांगितले.
तत्पूर्वी, आपली अल्पवयीन मुलगी दिसत नसल्याचे पाहून तिच्या आईने जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलीचा शोध सुरू असताना, अल्पवयीन मुलीच्या मावशीला 24 जुलै रोजी रतन नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने तिला अल्पवयीन मुलीबाबत सांगितले. त्यानंतर मुलीची आई व इतर काही नातेवाईक हे राजस्थान येथे गेले आणि त्यांनी मुलीला घरी आणले.
त्यानंतर, त्यांनी ही माहिती जुने शहर पोलिसांना दिली. त्यावरून जुने शहर पोलिसांनी या घटनेचा तपास करीत यातील विक्की कदम, स्वप्निल गवई, प्रतिक बनकर आणि त्यांचा एक साथीदार अशा चार आरोपींना 12 तासांच्या आत अटक केली आहे. घटनेचा आणखी तपास जुने शहर पोलीस निरीक्षक प्रकाश पवार करीत आहेत.