अकोला -आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसैनिक म्हणून पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी येथे केले. तसेच मनामध्ये कोणतेही किंतु-परंतु न ठेवता पक्षासाठी काम करा. स्वतःला तिकीट मिळाले नाही म्हणून पक्षाच्या उमेदवाराला मदत करणार नाही, असा दृष्टीकोन न ठेवता जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा, अशा कानपिचक्या ही पदाधिकारी आणि शिवसैनिकांना दिल्या. मराठा मंगल कार्यालयात शिवसेनेचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
पुढे ते म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांनी त्यासोबतच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एक संघटनेप्रमाणे एकत्रित श्रम करून पक्षाचा उमेदवार निवडून आणणे, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. उमेदवार जरी पक्षाचा असला तरी निवडून आलेला हा पक्षच आहे. मला तिकीट नाही तर माझ्या पत्नीला तिकीट मिळावे, असा आग्रही कोणी करू नये, असेही ते म्हणाले.