अकोला- माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे आजारपणाने मुंबई येथे निधन झाले आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून अकोला 12 वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. मुंबईमधील रुग्णालयात त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर काळाच्या पडद्याआड - congress leader babasaheb dhabekar
माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे आजारपणाने मुंबई येथे निधन झाले आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून 12 वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.
बाबासाहेब धाबेकर बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गावचे उपसरपंच होते. त्यानंतर सरपंच आणि पंचायत समितीचे सद्स्य, सभापती, जिल्हापरिषद अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भुषवली. बाबासाहेब धाबेकरांनी कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते विजयी देखील झाले होते. १९९५ च्या विधानसभेत त्यांनी भाजप-सेना युतीला पाठिंबा केला. याचवेळी त्यांनी ४२ अपक्ष आमदारांचे नेतृत्त्व केले होते. युतीच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपद देखील मिळाले. त्यांनी मनोहर जोशी आणि विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात काम केले होते. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर अकोला येथून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. तसेच ते तब्बल १२ वर्ष अकोला जिल्हा परिषदेचे सद्स्य देखील होते.
अकोल्यातच नव्हे तर वाशिम जिल्ह्यात देखील त्यांचा चांगला प्रभाव होता. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मोठा परिवार आहे. त्यांच्यावर बुधवारी त्यांच्या मुळगावी धाबा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.