अकोल्यातील 5 पशु वैद्यकीय केंद्रांना आयएसओ मानांकन; जिल्हा परिषदेचा उपक्रम - मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद
अकोला पंचायत समितीमधील पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना) मानांकन देण्यात आले आहे. या दवाखान्यांमध्ये आयएसओच्या नियमानुसार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या पाच पशु वैद्यकीय केंद्रांना आयएसओ मानांकन; अकोला जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग
अकोला - जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या अकोला पंचायत समितीमधील पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना) मानांकन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 28 पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्यात येणार आहेत.
अकोला जिल्हा परिषदेच्या अंतर्गत 68 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपचार मिळावेत, यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. आर. मिश्रा यांनी पहिल्या टप्प्यात 28 पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी अकोला पंचायत समितीमधील पाच दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. राहिलेले 40 दवाखाने लवकरच हे मानांकन प्राप्त करतील, अशी माहिती डॉ. एच. आर. मिश्रा यांनी दिली.
अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या घुसर, बोरगाव मंजू, भौरद, निंभोरा, कापशी येथील पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकन प्राप्त आहेत. या दवाखान्यांमध्ये आयएसओच्या नियमानुसार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.