अकोला -शहरात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी सायंकाळी एकूण ३५ जणांचा चाचणी अहवाल शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला. त्यापैकी ३० जण निगेटिव्ह आले असून ५ जणांचा कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले. यामध्ये एका मृत महिलेचा समावेश आहे. तसेच अन्य ४ रहिवासी दीपक चौक परिसरातील रहिवासी असून एकाच कुटुंबातील असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
निगेटीव्ह अहवालात सिंधी कॅम्पमधील रुग्णाच्या संपर्कातील आठ जणांच्या अहवालाचाही समावेश आहे. सिंधी कॅम्पमधील रुग्णांच्या संपर्कातील ५४ जणांची तपासणी आजपर्यंत झाली असून त्यातील ५० जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. आता फक्त चार जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे.
बुधवारी सायंकाळी उशिरा आलेले पाचही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात बैदपुरा भागातील महिलेचा समावेश आहे. ही महिला अत्यवस्थ अवस्थेत २८ एप्रिलला दुपारी रुग्णालयात दाखल झाली. दाखल झाल्यावर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आता सायंकाळी प्राप्त झाला असून तो पॉझिटीव्ह आला. त्यानंतर उर्वरित चार जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. हे चौघे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. या कुटुंबातील एक सदस्य हा प्रशासनाने सुरू केलेल्या रेड क्रॉस संचलित फिव्हर क्लिनिकमध्ये गेला होता. तेथे त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ते सर्व जण गेले. मात्र, ते लगेच निघून गेले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने मनपा, प्रांताधिकारी व पोलीस यांच्या सहाय्याने त्यांना घरून आणले. त्यांचे नमुने घेतले. आजच्या अहवालात ते चौघेही पॉझिटिव्ह आले आहेत.