अकोला- मूर्तिजापूर तालुक्यातील रंभापूर गावाच्या परिसरात 30 एकरावर उभारलेल्या निऑन व विधी कंपनीच्या सौरऊर्जा प्रकल्पाला ( Solar Power Project ) रविवारी (दि. 17 एप्रिल) दुपारी ट्रांन्सफॉर्मरजवळ स्पार्किंग झाल्यामुळे आग लागली होती. आगीच्या ठिणग्या गवतावर पडल्याने आग परिसरात पसरली. या आगीत साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
रंभापूर नजीक सौरऊर्जा प्रकल्पाला भीषण आग तालुक्यातील रंभापूर परीसरात वेगवेगळ्या कंपनीचे शेकडो एकरावर सौरऊर्जा प्रकल्प ( Solar Power Project ) उभारण्यात आले आहे. या कंपनीच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या ट्रांन्सफॉर्मरजवळ स्पार्किंग होवून आगीच्या ठिणग्या गवतावर पडल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता आगीने वाऱ्याच्या दिशेने पेट घ्यायला सुरुवात झाली. 30 एकरावर निऑन तर 10 एकरावर विधी कंपनीच्या क्षेत्रात आग पसरली. आगीचे मोठमोठे डोंब दिसताच रंभापूर येथील गुणवंत महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
काहींनी याबाबत माना पोलीस ठाणे, मूर्तिजापूर व कारंजा अग्निशमन दलाला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर पोलीस ( Police ) व अग्निशमन दलाचे पथक ( Fire Brigade ) घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांसह शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही आग रंभापूर गावानजीक पसरली होती. रात्री नऊ वाजेपर्यंत ट्रॅक्टरच्या टँकरने पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती असून घटनास्थळी सरपंच प्रशांत इंगळे, मंडळ अधिकारी राजेंद्र जाधव यांनी भेट देवून मदतकार्यास सहकार्य केले.
शेतीचा नुकसान - ही आग ही परिसरात असलेल्या पिकांत पोहोचल्याने अमोल वाघ यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे पाईप जळून खाक झाले तर भटकर यांच्या शेवग्याच्या पिकांचे नुकसान झाले असून आसपास असलेल्या गव्हाच्या पिकांचेही नुकसान झाले आहे.
हेही वाचा -एसटी कर्मचारी फसवणूक प्रकरण : अजय गुजरला अकोला पोलिसांनी औरंगाबादमधून उचलले, तर दुसरा आरोपी पोलिसांना शरण