अकोला- एमआयडीसीतील क्रमांक 3 च्या न्यु विदर्भ ट्रेडिंग बेसन फॅक्ट्रीला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी ही आग नियंत्रणात आणली.
तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात -
एमआयडीसीतील बेसन फॅक्ट्रीला पहाटे अचानक आग लागली. आग लागल्याने तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. या कामगारांनी आगीची माहिती मालक, पोलीस आणि अग्निशमन दलास दिली. तब्बल दोन ते तीन तासांनंतर आग विझविण्यात अग्निशमन दलास यश आले. मात्र, ही आग पुन्हा पुन्हा भडकत असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना अतिरिक्त फेऱ्या माराव्या लागल्या. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवीतहानी झाली नाही. या आगीत किती नुकसान झाले व आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे.