अकोला - भंडारा जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात आग लागून शुक्रवारी मध्यरारात्री एक हृदयद्रावक घटना घडली. यात 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच प्रत्येक कुटुंबाला दहा लाखांचे अर्थसहाय्य मंजूर करावे, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
या दुर्दैवी घटनेत ज्यांच्या नवजात मुलांचा मृत्यू झाला त्या कुटुबियांच्या दु:खात वंचित सहभागी आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे. मात्र ही मदत तोकडी असून कमीत कमी दहा लाख रुपये प्रत्येक कुटुंबातील पालकांना देण्यात यावेत, अशी मागणी आता करण्यात आली आहे.