अकोला- नेहमी वडिलांचे टोमणे ऐकून राग सहन न झालेल्या मुलानेच वडिलांना दगड आणि काठीने मारून खून केल्याची घटना सावरगाव येथे घडली. यासंदर्भात चान्नी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.रामसिंग मेघा चव्हाण असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून अंकुश असे आरोपीचे नाव आहे.
वडिलांचा राग सहन न झाल्याने केला बापाचाच खून चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथे रामसिंग मेघा चव्हाण हे पत्नी, थोरला मुलगा लव आणि धाकटा मुलगा अंकुश यांच्यासोबत राहतात. साडेतीन एकर शेतीवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दररोज काम करायचे आणि पोटाची खळगी भरायची असा या कुटुंबाचा संसाराचा गाडा आहे. धाकटा मुलगा अंकुश हा बारावी शिकलेला आहे.
सतत वडिलांचे बोलणे आणि राग पाहून थातूरमातूर काम करणारा अंकुश वडिलांवर नेहमीच नाराज असायचा. वडिलांच्या या प्रवृत्तीमुळे तो त्यांच्यावर कायम चिडलेला असायचा. दोन दिवसाआधी वडिलांचे आणि त्याचे काही कारणावरून वाद झाला. त्यावेळी वडील त्याला रागावले. वडिलांचा हा नेहमीचा राग त्याला सहन झाला नाही. त्याच्या मनातील वडिलांबद्दलचा राग उफाळून आला आणि त्याने १८ एप्रिलच्या मध्यरात्री शेतात झोपलेल्या वडिलांना दगड आणि काठीने जबर मारहाण करून त्यांना जागेवरच ठार केले.
ही घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर चान्नी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. त्यामध्ये धाकटा मुलगा अंकुश त्याच्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने घटनेची हकीकत सांगितली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.