अकोला- एकीकडे शेतकरी सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी करीत आहेत. तर दुसरीकडे मात्र मूर्तिजापूर तालुक्यातील अलादतपूर येथील काही शेतकऱ्यांनी घरातीलच सोयाबीन बियाणे पेरुन भरघोस उत्पन्न घेण्याचा चंगच बांधला आहे. या परिसरामध्ये असलेल्या शेतांमध्ये हिरवळ होती. या भागातून जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ जात असताना या शेताची त्यांनी पाहणी केली. तसेच येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.
यंदाच्या वर्षी पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान खात्याने दर्शविला होता. परंतु, जून महिन्यात सुरू झालेल्या पावसाने आपला रंग दाखविलाच. पहिला पाऊस 11 जून त्यानंतर 16 जून रोजी पडलेल्या पावसात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यानंतर पाऊस न पडल्याने त्यांना दुबार पेरणीचे संकट आले. तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या. एकीकडे शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारी आणि त्यांचे पंचनामे करण्याचे शासनाकडून आलेले आदेश हे काम सुरू आहे. मात्र, दुसरीकडे मूर्तिजापूर तालुक्यातील अलादतपूर या गावात असलेल्या शेत शिवारामध्ये शिवारामध्ये सोयाबीन हे डौलाने उभे होते.