अकोला - कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर स्वतंत्रपणे कांदा विकत आहेत. मात्र, त्याला योग्य हमीभाव मिळत नाही. यामुळे कांदा उत्पादकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
अकोल्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून विकतायेत कांदा - ग्राहक
कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर स्वतंत्रपणे कांदा विकत आहेत.
अकोल्याच्या बाजारात कांद्याला १५ ते २० रुपये किलो भाव आहे. हा कांदा बाजारात शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्याकडे ३ ते ४ रुपये किलोने विकला जातो. व्यापारी हा कांदा किरकोळ व्यावसायिकांना ८ ते १० रुपयात विकतो. हेच किरकोळ व्यापारी कांद्याचे भाव बाजारात १५ ते २० रुपयांपर्यंत नेतात. शेतकरी ते किरकोळ व्यापारी, असा प्रवास पाहिला तर कांद्याला ४ रुपयापासून ते २० रुपयांपर्यंत भाव मिळतो. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी हा कांदा रस्त्यावर विक्रीस उपलब्ध केला तर ग्राहक त्याला ढुंकूनही पाहत नाहीत. काही ग्राहक भाव करून शेतकऱ्याची थट्टा उडविण्याचा प्रयत्न करतात. यातील अनेक ग्राहक हे फक्त टाईमपास म्हणून शेतकऱ्याकडे जाऊन कांद्याचे भाव आणि त्याची प्रजाती विचारतात. त्यामुळे आशेने ग्राहकांची वाट पाहत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ग्राहकांकडून बऱ्याच वेळा थट्टा होते. कांदा खरेदी करण्याऐवजी शेतकऱ्यांची टिंगल उडविण्याचा हा प्रकार शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौकाचौकांमध्ये दिसून येतो आहे.
शासनाने कृषी विभागाच्या आत्मा विभागातर्फे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन बऱ्याचवेळा दिले जाते. प्रत्यक्षात मात्र, याबाबत काहीच उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांना बाजारपेठेत उपलब्ध करुन देण्यासाठी आत्माने प्रत्यक्षात काम करण्याची गरज आहे, असे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.