अकोला - शिक्षकाला वेतन न मिळाल्यामुळे त्यांनी कुटुंबासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सिटी कोतवाली पोलीस, अग्निशमन दल यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या शिक्षकाची समजूत काढली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत सात दिवसांच्या आत वेतन अदा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिक्षकांने आज दुपारी आपले आंदोलन मागे घेतले.
अकोल्यात थकीत वेतन मिळत नसल्याने शिक्षक कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न; जिल्हा परिषदेत उडाली खळबळ
शिक्षक असलेल्या प्रविण गणेश चव्हाण यांचे जवळपास तीन वर्षांपासूनचे वेतन थकीत होते. या थकीत वेतनासाठी त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. न्यायालयाचे दार ठोठावले मात्र, तरीही वेतन न मिळाल्याने त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
श्यामकी माता प्राथमिक शाळा, पिंजर येथे प्रवीण गणेश चव्हाण हे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मार्च 2015 ते 19 नोव्हेंबर 2018 पर्यंत त्यांचे वेतन थकीत आहे. वेतनासाठी त्यांनी शाळेचे व्यवस्थापक तसेच जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या. परंतु, तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. शेवटी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयानेही चव्हाण यांच्या बाजूने निकाल देत वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. शेवटी त्यांनी पंधरा दिवसाआधी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना 30 जूनपर्यंत वेतन अदा न केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार प्रवीण चव्हाण यांची पत्नी प्रीती व मुलगा वेदांत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात समोर येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी हजर असलेल्या कोतवाली पोलीस आणि अग्निशमन दलाने त्यांना थांबवून त्यांची समजूत काढली.
या घटनेनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांच्यासोबत त्यांची भेट घेऊन या विषयावर तोडगा काढला. पवार यांनी सात दिवसांच्या आत वेतन अदा करण्याच्या प्रक्रियेला पूर्णविराम मिळेल आणि तुम्हाला वेतन देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी आपल्या कुटुंबासह असलेले आंदोलन मागे घेतले. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, जिल्हा परिषदेत पोलीस विभागासह अग्निशमन दल ही दाखल झाले होते.