अकोला- फणी वादळामुळे मान्सूनचा पाऊस येण्यास विलंब होवू शकतो. याची दक्षता घेवून पिण्याच्या पाण्याची टंचाई, गुरांसाठी चारा टंचाई तसेच नागरिकांना रोजगार हमी योजनेतंर्गत कामे मिळण्याबाबत नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
दुष्काळग्रस्त गावातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी जिल्हास्तरावर वॉररूमची स्थापना करावी आणि पाणी टंचाई व दुष्काळग्रस्त परिस्थितीचा दररोज सकाळी ठराविक वेळेत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाशी संपर्क साधून आढावा घेवून उपाययोजना कराव्यात, असेही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील पाणी टंचाई व दुष्काळ सदृश्य परिस्थीतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृतहात आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्ह्यात पाणी टंचाई कार्यक्रम अंतर्गत विंधन विहीर, कुपनलीका, नळयोजना विशेष दुरूस्ती, तात्पुरती पाणी पुरवठा नळ योजना, टँकर, विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण व गाळ काढणे, यासारख्या 569 उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. त्यापैकी 334 उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून 240 योजना पूर्ण झाल्या आहेत. तर उर्वरीत 94 योजना प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या 137 कोटी रूपयाच्या दुष्काळ निधीचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात टंचाईग्रस्त असलेल्या गावात टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. गावातून टँकरची मागणी आल्यावर तत्काळ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.