अकोला - अकोल्यात आज (बुधवार) सकाळी प्राप्त अहवालानुसार 54 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील 18 कैदी हे पॉझिटिव्ह सापडले असून तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. कारागृह सूत्रांच्या माहितीनुसार यातील एकही कैदी हा नवीन नसून ते कोणाच्याही संपर्कात नाहीत. तसेच येथील कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचेही समजते.
आज सकाळी प्राप्त अहवालात 54 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 18 पुरुष रुग्ण हे जिल्हा कारागृहातील आहेत. तर, उर्वरित 36 जणांमध्ये 14 महिला आणि 22 पुरुष आहेत. त्यात तीन महिन्यांच्या बालकाचाही समावेश आहे. यातील सातजण तारफैल, सातजण न्यू तारफैल, दगडीपूल येथील चारजण, खदान येथील दोनजण, बाळापूर येथील दोनजण, तर उर्वरित बार्शी टाकळी, कामा प्लॉट, सिंधी कॅम्प, रामदास पेठ, सिव्हील लाईन, शिवर, जीएमसी होस्टेल, कळंबेश्वर, जळगाव जामोद, लहान उमरी, कान्हेरी गवळी, सिद्धार्थ नगर, आदर्श कॉलनी, परदेशीपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
काल 23 जून रोजी रात्री तीनजणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात सोनटक्के प्लॉट येथील 70 वर्षीय पुरुष असून ते 12 जून रोजी दाखल झाले होते. अन्य एक डाबकी रोड येथील 48 वर्षीय पुरुष रुग्ण असून हे 9 जून रोजी दाखल झाले होते. तर, कामा प्लॉट येथील 80 वर्षीय महिला रुग्ण असून ही महिला 21 जूनरोजी दाखल झाली होती.