अकोला -भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 520 रँक घेऊन उत्तीर्ण झालेल्या मुलाचे यश पाहून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बाबुसिंग राठोड यांच्या डोळ्यात अश्रू आले. मुलाला पोलीस अधीक्षक म्हणून बघून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया अश्विन राठोड याच्या वडिलांना आज 'ईटीव्ही भारत'ला दिली.
दुसऱ्या प्रयत्नात मिळवले यश -
यूपीएससी सारखी परीक्षा उत्तीर्ण करून अश्विन राठोड याने अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. स्वतः अभ्यास करून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण भारतातून 520वी रँक प्राप्त केली आहे. अश्विनचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अकोला इथेच झाले असून त्याने बारावी आणि बीएस्सीपर्यंतच शिक्षण नागपूरमधून केले आहे. त्याला यूपीएससीद्वारे अधिकारी व्हायचे असल्याने त्याने मेहनतीने परीक्षेचा अभ्यास केला. दुसऱ्या प्रयत्नातच लाभलेल्या अतुलनीय यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. त्याची आई ललिताबाई राठोड या गृहिणी असून वडील बाबूसिंग राठोड सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. अश्विनने स्वतः नियमित अभ्यास करून हे यश मिळविले आहे. अश्विनला पोलीस अधीक्षक किंवा आयआरएस सेवा अपेक्षित आहे. संपूर्ण जिल्ह्यातून मित्र परिवार, नातेवाईक तथा शुभचिंतक यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव अश्विन राठोडवर करण्यात येत आहे. आपल्या यशाचे श्रेय अश्विनने आपले आई वडील, भाऊ, बहीण आणि शिक्षकांना दिले आहे.
हेही वाचा -UPSC साठी सोडली अमेरिकेतील नोकरी....पाहा देशात 37 वा आलेल्या विनायक नरवडेची यशोगाथा