अकोला : जिल्ह्याच्या अकोट येथील तक्रारदारास सातवा वेतन आयोग लागू करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा उपनिबंधक प्रविण लोखंडे यास सहकार विभागाने निलंबित करण्यात आल्याचे आदेश काढले. यातील दुसरा आरोपी जीएसटीचा वर्ग एकचा अधिकारी अमरप्रीत सेठी हादेखील याच प्रकरणात कारागृहात आहे.
लाचखोर जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे अखेर निलंबित; २ लाखांची स्विकारली होती लाच
तक्रारदार यांचे व त्यांच्या अधिनस्त असलेले कर्मचारी यांचे ७ वे वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व एरियसच्या प्रस्तावास मान्यता देण्याकरता ५ लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा उपनिबंधक प्रविण लोखंडे यास निलंबित केल्याचे आदेश काढण्यात आले आहे.
तक्रारदार यांचे व त्यांच्या अधिनस्त असलेले कर्मचारी यांचे ७ वे वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व एरियसच्या प्रस्तावास मान्यता देण्याकरता जिल्हा उपनिबंधक प्रविण लोखंडे याने विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त अमरप्रित सेठी याच्या मार्फतीने पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. दोन लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारली. परंतु, तक्रारदार यांनी दोन लाख आहेत असल्याचे सांगितल्यावरुन अमरप्रीत सेठी याने तुमच्याकडे पूर्ण रक्कम होईल तेव्हा द्यावी, असे म्हणून रक्कम परत केली. त्यामुळे या दोन्ही आरोपीनां एसीबीने नऊ जुलैरोजी अटक केली.
या अटकेनंतर या दोघांनाही पोलीस कोठडी मिळाली होती. तर, सध्या हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोघांनाही जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, सहकार विभागाने जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यास निलंबित केले आहे. तसेच त्यांचे निलंबनातील कार्यालय अमरावती कार्यालय राहील. विक्रीकर सहायक आयुक्त सेठी याच्या निलंबनाचे आदेश अद्याप निघाले नसल्याचे समजते.