अकोला - जिल्ह्यातील महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र येथील ओझोन वायु प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती करुन त्याची अकोला जिल्ह्यात सध्याच्या आपत्तीच्या काळात उपलब्धता करता येते का? याबाबतच्या शक्यतेसंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांचे समवेत महानिर्मिती पारस औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता खराटे व उप मुख्य अभियंता दामोदर तसेच बाळापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी उपस्थित होते.
पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न - ऑक्सिजन सिलेंडर बद्दल बातमी
पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
औष्णिक विद्युत निर्मिती करतांना आवश्यक असणाऱ्या ओझोन वायुच्या उपलब्धतेसाठी येथे ऑक्सइजन निर्मिती केली जाते. त्यासाठी पारस येथे दोन संयंत्रे आहेत. या ठिकाणी निर्माण होणारा ऑक्सिजन हा ओझोन प्रक्रियेसाठी वापरला जात असल्याने निर्माण होणारा ऑक्सिजन हा सिलिंडरमध्ये भरण्याची व्यवस्था येथे नाही. त्यासाठी आवश्यक कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामुग्री येथे उभारल्यास येथून 500 सिलिंडर इतका ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी पापळकर यांनी व्यक्त केला.
याठिकाणी सिलिंडर्स भरता यावे यासाठी संयंत्रे उभारण्याबाबत पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे, महाजेनको व शासनस्तरावर पाठपुरावा करुन प्रयत्न सुरु आहेत. पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांनी प्राधान्य देऊन पाठपुरावा करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. त्यासाठी जिल्हा प्रशासनही प्रयत्न करीत आहे, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी स्पष्ट केले.