अकोला - दोन मजुरांमधील वाद एकमेकांच्या जीवावर उठला. ही घटना एमआयडीसी 4 मधील प्लायमायका एंटरप्राइजेस निर्माणाधीन कंपनीत शुक्रवारी रात्री घडली. यामध्ये उत्तर प्रदेश येथील राहणाऱ्या एका मजुराने सोबतच्या मजुराचा दगडाने ठेचून खून केला. त्याचा मृतदेह शौचालयासाठी बांधण्यात येणाऱ्या खड्ड्यात ओढत नेऊन गाढून टाकला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी मजुरास अटक केली आहे. भांडणाचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अरविंद मनोज विश्वकर्मा असे मृत मजुराचे नाव असून होरीलाल उर्फ अजय श्रीचंदन गौतम असे आरोपी मजुराचे नाव आहे.
अकोला एमआयडीसीत दोन परप्रांतीय मजुरांमध्ये वाद.. एकाने गमावला जीव एमआयडीसी 4 मध्ये विनय लालवाणी यांचे निर्माणाधीन कंपनीमध्ये उत्तर प्रदेशातील तीन मजूर काम करण्यास आलेले आहेत. हे तिन्ही मजूर याच कंपनीमध्ये राहतात. एक मजूर हा झोपलेला होता. तर अरविंद विश्वकर्मा व अजय गौतम यांच्यामधील शुक्रवारी रात्री काही कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर अजय गौतम याने अरविंद विश्वकर्मा यांच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. त्यानंतर त्याने मृतदेह फरपटत नेऊन जवळपास शंभर फुटावर असलेल्या शौचालयासाठी बांधण्यात येणाऱ्या टाक्यामध्ये टाकून तो बुजवून टाकला. अजय गौतम याने सकाळी मालकाला फोन करून अरविंद विश्वकर्मा हा रात्रीपासून कंपनीमध्ये आला नसल्याची माहिती दिली. त्यांनी ही माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्यांना संशय आल्याने त्यांनी तसेच ठसे तज्ञ पथक, श्वान पथक यांना बोलावून घेतले. त्यानंतर अजय गौतम याची विचारपूस केली असता प्रकरण उघडकीस आले. तसेच परिस्थितीजन्य पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अजय गौतम यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण करीत आहे.
मृताचे होते लग्न -मृतक अरविंद विश्वकर्मा याचा विवाह एप्रिल महिन्यात होणार होता. परंतु, देशभरातील संचारबंदीमुळे त्याचा विवाह पुढे ढकलण्यात आला होता. विवाह होण्याआधीच त्याच्यावर काळाने झडप घातली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.