अकोला- जिल्हा प्रशासनाने कोविड केअर सेंटर स्थापित केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात सौम्य लक्षणे असलेल्या 98 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत येथून 463 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच अतिजोखमीचे व्यक्ती म्हणून 226 जणांनाही निरीक्षणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये सौम्य लक्षणांच्या 98 रुग्णांवर उपचार; अतिजोखमीच्या 226 व्यक्ती निरीक्षणात अकोला शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या देखभालीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयासोबतच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वसतीगृहाच्या वेगवेगळ्या इमारतींमध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या पॉझिटीव्ह व अतिजोखमीच्या म्हणजेच पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या निकट तसेच दूरस्थ संपर्कातील व्यक्तींना निरीक्षणासाठी वेगवेगळ्या इमारतीत ठेवण्यात येते. सद्यस्थितीत अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी 12 इमारतींमध्ये अलगीकरणाची व्यवस्था आहे. त्यात एक हजार 30 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात आतापर्यंत एक हजार 193 व्यक्ती दाखल होत्या. त्यापैकी 967 व्यक्तींना निरीक्षण कालावधी पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
सद्यस्थितीत येथे 226 व्यक्ती दाखल आहेत. 804 खाटा शिल्लक आहेत. कोवीड पॉझिटीव्ह असलेल्या मात्र, अत्यंत सौम्य वा अजिबात लक्षणे नसलेल्या रुग्णांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठाच्या वसतीगृहाच्या नरनाळा, शिवनेरी 'ए' व शिवनेरी 'बी' या इमारतींमध्ये निरीक्षणात ठेवण्यात येते. येथे एकावेळी 250 लोकांना निरीक्षणात ठेवले जाऊ शकते. येथे आतापर्यंत 561 जण दाखल झाले होते. त्यातील 463 व्यक्तींना बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. शिवाय सद्यस्थितीत येथे 98 व्यक्ती निरीक्षणात आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
कोविड केअर सेंटरचे संपूर्ण वैद्यकीय तपासणीचे नियंत्रण हे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण हे करीत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राठोड हे काम करीत आहेत. तसेच तेथील सर्व रुग्णांच्या निवास, भोजन, चहा, नास्ता इ. व्यवस्थांसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार व तहसीलदार विजय लोखंडे हे काम पाहत आहेत, असेही खडसे यांनी सांगितले.