अकोला -जिल्ह्यातील एका व्यक्तीने सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मृताच्या भावाने या प्रकरणाची तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केल्यानंतर त्यांच्या तीन पथकाने या तीनही सावकारांच्या घरावर छापे टाकले. या ठिकाणावरुन रोख रकमेसह, बाँड, खरेदीखत तसेच धनादेश जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अवैध सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे.
अवैध सावकारी प्रकरण : सहकार विभागाच्या छाप्यात बाँड, खरेदीखत, धनादेश आढळले - सहकार विभाग अकोला बातमी
अवैध सावकारी प्रकरणामध्ये आत्महत्या केलेल्या मानकर यांच्या भावाने या प्रकरणाची तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली होती. यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या ३ पथकाने सदर तिन्ही संबंधितांच्या घरावर छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणामुळे अवैध सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील घुइखेड येथील रहिवासी तसेच अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडते असलेले गणेश मानकर यांनी अकोल्यातील तीन सावकारांच्या जाचामुळे आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करून या अवैध सावकारांच्या जाचामुळेच आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांच्या एका पथकाने कौलखेड रोडवरील एसटी कॉलनीतील विठ्ठल रुख्मिणी अपार्टमेंटमध्ये रहिवासी असलेल्या नरेंद्र गुणवंतराव देशमुख याच्या निवासस्थानी छापा टाकला. या कारवाईत १ ते १२ खरेदी खत, त्याचे व कुटुंबाचे वैयक्तीक एकूण चेकबूक क्र.१ ते १०, त्याच्या कुटुंबाचे वैयक्तिक विविध बँकेचे एकूण १३ पासबुक तसेच नगदी रोख रक्कम असे एकूण १ लाख ०७ हजार७२० रुपये जप्त केले.
तर, दुसऱ्या पथकाने भानुदास गजानन पवार रा. म्हैसांग याच्या निवासस्थानी छापा टाकून त्याच्याकडून १ चेकबुक, एकुण ५ सुटे चेक, खरेदी खत ३, दोन कोरे खरेदी खत, दोन कोरे चेकबुक, त्रेयस्त व्यक्तीची ३ पासबुक, एक छोटी डायरी, नगदी रोख रक्कम आणि एकूण ६२ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले. तिसरा छापा किशोर भुजंगरव देशमुख रा. मुकुंद नगर अकोला याच्या निवासस्थानी टाकण्यात आला. या कारवाईत त्या ठिकाणावरुन ९ खरेदी खत, एकूण चेक १, कोरे बाँड २, ईसार पावती १, मूळ करारनामा १, कच्ची पावती १२ जप्त करण्यात आल्या आहेत. या बाबतीत प्राप्त दस्तऐवजांची छाननी तसेच संबंधीत साक्ष पुरावे नोंदवून महाराष्ट्र सावकारी (नियमन)अधिनियम २०१४ अन्वये पुढील कारवाई करण्यात येणार आहे.