अकोला - संपत्तीच्या वादावरून मुलीने वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील खदान परिसरात घडली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागे राहणाऱ्या या कु़टुंबामध्ये रात्री उशिरा हा प्रकार घडला. बाबुराव कंकाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून, रेश्मा या त्यांच्या मुलीने हे कृत्य केले.
संपत्तीच्या वादावरून मुलीने वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील खदान परिसरात घडली आहे. बुलडाणा जिल्ह्यात अडीच एकर शेती आणि दोन खोल्यांचे घर, अशी संपत्ती बाबुराव कंकाळ यांच्या नावावर असून, त्यांना एक 22 वर्षांचा मुलगा तसेच रेश्मा नामक मुलगी आहे.
आरोपी रेश्मा बाविस्कर मुंबईत राहते. ती काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांकडे आली होती. बाबुराव व रेश्मा यांमध्ये रात्री उशिरापर्यंत मालमत्तेच्या वाटपाबाबत वाद सुरू होता. यानंतर चिडलेल्या रेश्माने घरातील चाकूने वडिलांवर हल्ला चढवला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. हे पाहून मुलाने आरडाओरड केल्याने शेजारी जमा झाले. उपस्थितांनी बाबुराव कंकाळ यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतले असून, तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.