अकोला - जिल्ह्यातील मुर्तिजापूर वगळता सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत कापूस खरेदी केंद्र बुधवापासून सुरू करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी सर्व बाजार समित्यांना दिले आहे. त्यासंदर्भात पणन संचालनालयाने मार्गदर्शक कार्यपद्धती व अटी शर्तीही पाठवल्या आहेत. त्या पद्धतीचे पालन करुन आधी मोबाईल वा फोनवरुन मालाची नोंदणी करुन नंतर शेतकऱ्यांना केवळ प्रत्यक्ष कापूस खरेदीच्या दिवशीच बाजार समितीत बोलवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर ही कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे.
कापूस खरेदी केंद्र बुधवारपासून होणार सुरु; जिल्हा उपनिबंधकांचे निर्देश
जिल्ह्यातील मुर्तिजापूर वगळता सर्व बाजार समित्यांमध्ये योग्य ती काळजी घेत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व सातही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे खरेदी-विक्रीचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. परंतु लॉकडाऊन घोषित केल्यापासून जिल्ह्यातील सर्व प्रकारची कापूस खरेदी केंद्र बंद आहेत. शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १४ मार्च पासून लागू करून खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केली आहे.
सीसीआयची कापूस खरेदी केंद्र 20 पर्यंत सुरू होणे शक्य नसल्याने जिल्ह्यातील बाजार समिती अंतर्गत येणारे परवानधारक खाजगी व्यापारी यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पणन संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकातील सूचनांनुसार तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक कार्यपद्धतीचे पालन बाजार समित्यांनी दक्षता घेण्याच्या अटी व शर्तीस अधीन राहून जिल्ह्यातील मुर्तिजापूर व्यतिरीक्त सर्व कापुस खरेदी केंद्र संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरात सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.