अकोला - 60 वर्षे वयोगटातील जेष्ठ नागरिकांना आज जिल्ह्यातील आठ लसीकरण केंद्रांवर कोरोना लस देण्यात येत आहे. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष नोंदणी करून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सकाळपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील कोविड - १९ वॉरियर्सचेही लसीकरण या ठिकाणी सुरू आहे. दुपारपर्यंत 50 जेष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. मनीष शर्मा यांनी दिली. कुठल्याही जेष्ठ नागरिकाला आतापर्यंत लसीकरणानंतर त्रास झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा -अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंधन दरवाढ विरोधात आंदोलन
कुठलाही त्रास झाला नसल्याची माहिती
जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना वॉरियर्सचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला जिल्हा स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महापालिकेने ठरवून दिलेल्या रुग्णालयात सकाळपासून सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत पन्नास जणांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती आहे. ज्या जेष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले, त्यांना कुठलाही त्रास झाला नसल्याची माहिती आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.