अकोला- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वच क्षेत्रातील व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व रिक्षाचालकांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्वराज्य भवन येथे 200पेक्षा जास्त रिक्षाचालकांची आरटीपीसीआर कोरोना तपासणी करण्यात आली.
२००पेक्षा अधिक रिक्षाचालकांची कोरोना तपासणी
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज शहरात चारशे पेक्षा अधिक कोरोना रुग्ण निघत आहे. परिणामी जिल्ह्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या सहा हजाराच्यावर गेली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्यांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यांनी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तपासणीही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऑटोचालकांची कोरोना तपासणी करण्यासाठी स्वराज्य भवन येथे कार्यक्रम आखण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून रिक्षाचालकाची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. स्वराज्य भवन येथे मनपाच्या फिरत्या तपासणी पथकाने रिक्षाचालकांची आरटीपीसीआर तपासणी केली. जवळपास 200 चालकांनी ही तपासणी करून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित होते.