अकोला- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात सध्याचा कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात संसर्ग फैलावत असून नागरिकांचा हलगर्जीपणाही कारणीभूत ठरत असल्याचे मत आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या तीन सुत्री कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याचे आपण विसरलो असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
कोरोना विषाणूमध्ये संसर्ग वाढविण्याचे प्रमाण जास्त कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या कशामुळे वाढते आहे. त्याचे नेमके कारण काय या संदर्भात ईटीव्ही भारताचे प्रतिनिधी जीवन सोनटक्के यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोना संपला ही मानसिकता धोक्याची-
डिसेंबर नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला होता. परंतु, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारीत कोरोनाचे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोना संपला अशी मानसिकता आपली झाली होती. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर कमी केला; सॅनिटायझर न वापरने, सोशल डिस्टन्सिंग न राखणे अशा प्रकारे बेजाबाबदारपणाचे वर्तन दिसून आले. त्यामुळे कोरोना संपला असे गृहीत धरून राहणेच कोरोनावाढीसाठी कारणीभूत ठरले आहे. मात्र, मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर या तीन सुत्री कार्यक्रमांचे जर सातत्याने अंमलबजावणी केली असती तर कोरोना हा डिसेंबरच्या तुलनेत अधिकप्रमाणात आटोक्यात आला असता, असे मत डॉ. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
कोरोना बाधित रुग्णांपासून धोका अधिक वाढला-
सध्याचा कोरोना बाधित रुग्ण हा कोरोनाचा जास्तीत जास्त प्रसार करणारा म्हणून गणला जात आहे. रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे जास्त दिसत आहेत. 85 टक्के रुग्ण हे या लक्षणांमध्ये आढळत असून 10 ते 15 टक्के हे रुग्ण जास्त प्रमाणात लक्षणे दिसून आल्यावर उपचार घेत आहेत. परंतु, या 85 टक्के रुग्णांपासून धोका वाढला आहे. त्यांच्याकडून कोरोना मोठ्या प्रमाणात स्प्रेड होत आहे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक असल्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांमध्ये जोखीमचे प्रमाण कमी असले तरी रुग्ण संख्या वाढणे ही चिंताजनक बाब आहे. यासंदर्भात नागरिकांनी सतर्क राहून आपली काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे. त्यासोबतच सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे गरजेचे असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी सांगितले आहे.