अकोला -येथील आरोग्य विभागामध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत घेण्यात यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. समायोजनेच्या संदर्भात सरकारसोबत बऱ्याच वेळा पाठपुरावा करून बैठकाही झाल्या. मात्र, त्यावर कुठल्याच प्रकारचा निर्णय न झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे, कोविडच्या कामांवर मात्र याचा परिणाम झाला आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये आरोग्य विभागात परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, लिपिक, समुपदेशक यासह आदी पदांवर पंधरा वर्षांपासून हे कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर आपले कर्तव्य पार पाडावे लागते. कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी त्यासोबतच विलगीकरण कक्ष, कोरोना आयसोलेशन वार्ड याठिकाणी एनआरएचएममधील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका आपले कर्तव्य बजावित आहेत. जीव मुठित घेऊन हे वैद्यकीय अधिकारी व परिचारिका रुग्णांची सेवा करत आहेत. तुटपुंज्या मानधनावर या कर्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे.