अकोला- किमान आधारभूत किंमत केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी जाहीर केली ती नाममात्र आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांची परीक्षा किती पाहणार, असा आरोप करत केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांना मरण यातना या माध्यमातून देत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि. 11 जून) केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोला दौऱ्यावर आहेत. स्वराज्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्र सरकार शेतकऱ्यांना देतेय मरण यातना; हमीभावाला काँग्रेसचा विरोध - अकोला शहर बातमी
केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव खूप कमी असून केंद्र सरकार शेतकऱ्यांना मरण यातना देत आहे, अशी टीका कांँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी सर्वच पिकांबाबत हमीभाव जाहीर केला आहे. हा हमीभाव शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. केंद्र सरकारने जी किंमत दिली आहे. ती शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देशात केंद्र सरकार इंधन, खत, बियाणे, औषधी सर्वांचे भाव वाढवीत आहे. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव मिळावा, या पद्धतीची व्यवस्था तयार करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जे मूल्य जाहीर केले आहे ते अत्यल्प आहे. दरवर्षी कमीत कमी दहा टक्के वाढ त्यात व्हायला हवी आणि ती होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किंमतीचा आम्ही विरोध करत आहोत. तसेच केंद्र सरकारचा निषेधही करत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेवटी म्हटले. या पत्रकार परिषदेला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -प्रतिबंधित एचटीबीटी लागवडीच्या सप्ताहाचे शेतकरी संघटनेकडून उद्घाटन; देशात नाहीये परवानगी