अकोला - देशातील बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न व कमकुवत अर्थव्यवस्थेबाबत केंद्र सरकार झोपेचे सोंग घेत आहे. तसेच शेतकर्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये देशात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला आम्ही समर्थन करीत असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी दिली आहे. स्वराज्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्यावसायिकांनाही केंद्र सरकार दिलासा देत नाही. महागाईचा मोठा फटका केंद्र सरकार देशवासीयांना देत आहे. केंद्र सरकारची ही भूमिका संशयास्पद आहे. परिणामी, केंद्र सरकारविरोधात देशात विरोधाची लाट निर्माण झाली आहे. देशामध्ये केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे या सर्व व्यवस्थेच्या विरोधात काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. त्यासाठी देशभरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. भारत बंद आंदोलनात सर्व व्यापारी सहभागी होणार आहेत. तसेच इतर संघटना व इतर राजकीय पक्षांनीही या बंदला समर्थन दिले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.