अकोला- मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेसने आज मनपासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. आगामी सर्वसाधारण सभेत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू न केल्यास सभा चालू देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. या आंदोलनात काँग्रेस सोबत मनपा कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात नारेबाजी केली.
गेल्या 15 ते 18 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमसेवेत घ्यावे व इतर मागण्यांसाठी काँग्रेसकडून धरणे आंदोलन करण्यात आले. मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, सहावा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम द्या, रजारोखीची रक्कम त्वरित अदा करा, कालबध्द कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन फरकाची रक्कम द्या आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.