अकोला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लाखनवाडा, कापशी, म्हैसपूर फाटा येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सोयाबीन, कपाशी व ज्वारीच्या पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांनी त्यांना शेतातील नुकसान झालेली पिके दाखविली. यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झालेल्या नुकसानीबाबत मदतीची मागाणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला लाखनवाडा या गावातील शेतकरी संजय अघडते आणि केशव गावंडे यांच्या शेतात पाहणी केली. येथे त्यांनी अघडते यांच्या शेतातील सडलेले सोयाबीन आणि पाण्यात असलेल्या आणि गळालेल्या कपाशीच्या बोंडांची पाहणी केली. यावेळी अघडते यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली. कापशी येथील मनोहर गावंडे, राहुल निखाडे, चिखलगाव येथील विनोद थोरात या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आपल्या समस्यांचा पाडा वाचला.