अकोला: शासकीय विश्रामगृह येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. पुढे ते म्हणाले, इंदूमिलच्या जागेच्या संदर्भात चर्चा झाली. 130 फुटांचा पुतळा आहे. त्याची एकाचवेळी रेखनिका होऊ शकत नाही. जर आपण पीस बाय पीस त्याची रेखनिका केली तर कुठल्याही समितीला निर्णय घ्यायला सोपे होईल. एकाचवेळी 130 फुटाचा रेखनिका आपण जर केली तर त्याच्यावर समिती काही निर्णय देऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.
अधिकारी हेकेखोर असल्याची टीका: त्यासंदर्भात मी त्यांना सांगत होतो की, ती समिती आता अडकली आहे. मला तीन दिवसांपूर्वी मला समाज कल्याण खात्याचा अधिकाऱ्याचा फोन होता की सर्टीफाई करायला या. मी त्यांना सांगितले की, मी सर्टीफाई करेल. परंतु, मी त्यांना म्हटले की, नोएडामध्ये जी संस्था आहे, त्यांनी ही तुम्हाला सल्ला दिला. तो सल्ला आपण मान्य केला नाही. तुम्ही त्यांचा सल्ला का ऐकत नाही. तुम्ही जर मूर्तिकार असाल तर तुम्हीच सल्ला घ्या. अधिकारी हा कोणाचे ऐकत नाही, तो हेकेखोर असतो, असे मी त्यांना सांगितले. पुतळ्याचा एक एक भाग अप्रूव्ह करावे लागते. त्याच्याशिवाय तो पुतळा उभा राहू शकत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
वेळेआधी रस्ते पूर्ण करण्याचे आश्वासन:तसेच पीडब्लूडीचा रस्ता संपतो त्या रस्त्यांच्या बांधणीबाबत आम्ही जिल्हा परिषद मार्फत योजना आखत आहोत. ज्या शेतकऱ्यांना रस्ता हवा असेल त्यांनी बिडीओकडे पत्र द्यावे, परवानगी पत्र, दान पत्र असे द्यावे. त्यांच्यासाठी रस्ता आम्ही उभा करू, या दोन महिन्यात शेतकऱ्यांनी अर्ज, नकाशा, सहमती पत्र दिल्यास नियोजन करता येईल. निधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. आमचा कालावधी संपण्याआधी आम्ही हे रस्ते पूर्ण करण्याचे आश्वासन देतो, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.