अकोला - इतिहासातील पेशवा दुसरा बाजीराव आणि वर्तमानातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वागणूक एकसारखी आहे. पाच वर्षात मुख्यमंत्री हे दुसऱ्या बाजीराव पेशव्या प्रमाणेच वागले आहेत. त्यांनी बहुजन समाज आणि अल्पसंख्याकावर अन्याय केला आहे. कोल्हापूर, सांगली येथे पूरग्रस्तांसाठी काढलेला शासन निर्णय हा त्याच पद्धतीचा असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार नाना पटोले यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत केला.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करणाऱ्या सहा शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आलेले माजी खासदार नाना पटोले, स्वराज्य भवन अकोला, येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरस्थितीला महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारच जबाबदार आहे. पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेले मंत्री फक्त मुख्यमंत्र्यांना सेल्फी काढून पाठवयला गेले होते का? असे म्हणत त्यांनी या मंत्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. तर मागील पाच वर्षात या सरकारने फक्त राजेशाही सारखी सत्ता उपभोगली असल्याचा सूतोवाच देखील त्यांनी केला आहे.