अकोला-भाजपच्या महाजनादेश यात्रे दरम्यान अकोला क्रिकेट क्लब येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांवर निशाणा साधत केंद्रातच नव्हे तर राज्यात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यासोबतच अकोला विमानतळाला राज्य सरकार पूर्णपणे खर्च लावणार असल्याचे आश्वासनही त्यांनी आज सायंकाळी झालेल्या महाजनादेश यात्रेच्या सभेत दिले.
महाजनादेश यात्रे दरम्यान आयोजित सभेमध्ये गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, कामगार मंत्री संजय कुटे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे अकोल्यात जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेसमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अध्यक्ष नाही. अध्यक्ष कोणाला करावा, असा प्रश्न सध्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. तर त्यापेक्षाही वाईट परिस्थिती ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीनेन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना थांबा थांबा म्हणत आहेत. परंतु, या पक्षात कोणीही थांबण्यास तयार नाही. विरोधक हा जनतेसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी काम करत असल्यानेच त्यांच्याकडे आता विरोधालाही जागा नसल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
विरोधक जनतेचे प्रश्न सोडून ईव्हीएम मशीन विरोधात मोर्चा काढणार आहेत. ईव्हीएम ही मशीन असून ती मते देत नाही हे विरोधकांना कळत नाही. शरद पवार हे सुप्रिया सुळे निवडून आल्या म्हणून ईव्हीएम चांगली आणि अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे निवडून आले म्हणून ईव्हीएम मशीन खराब असा मशीनविरोधी गाजावाजा करीत आहेत. राष्ट्रवादीवरच कोणाचा विश्वास राहिला नसल्याचा आरोपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.
अकोला जिल्ह्यात अनेक विकास कामे झाली असून उरलेली कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावून त्यासाठी राज्य सरकार खर्च करेल आणि अकोल्यात विमानतळ उभे राहिल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी दिले.