अकोला : विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकींच्या प्रचारसभांना सुरूवात झाली आहे. अमरावती पदवीधर विधान परिषद निवडणुकीतील भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अकोल्यात आले होते. उद्धव ठाकरेंनी शक्तीप्रदर्शन केलं तरी काही फायदा होणार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी प्रचारादरम्यान केली आहे.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची केली प्रशंसा : ज्यावेळेस तुमच्याकडे अधिकार होता तेव्हा तुम्ही काहीच केले नाही. आता कितीही शक्ती प्रदर्शन केले तरी इकडे संताजी धनाजी सारखे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी दोन सरदार आहेत. आता हे दोघे नेते त्यांना पाण्यामध्ये दिसत आहेत. त्यामुळे हे दोन सरदार 18-18 तास महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यामुळे कितीही शक्तिप्रदर्शन केले आणि कितीही उड्या मारल्या तरीही काही होणार नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका : उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा उद्या कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे ते मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळेंना विचारले असता ते म्हणाले की, त्यांनी कोणते कोणते शक्ती प्रदर्शन करावे हे त्यांचा अधिकार आहे. ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते. त्यावेळेस त्यांचा पेनही चालत नव्हता. 18 महिने आमदारांचे पत्रावर सही होत नव्हती. त्यांच्या खिशात पेनही नव्हता. 18 महिने मुख्यमंत्री मंत्रालयात यायचे नाही. आज राज्याला चांगलं सरकार मिळालेले आहे आणि या सरकारच्या माध्यमातून राज्याचा चांगला विकास होईल, याची आपण आशा करू, असे ते म्हणाले.